सुजय विखेंनी घाई केली, निवडून तर संग्राम जगतापच येणार : सत्यजीत तांबे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. त्यात काँग्रेसमध्ये असलेले नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, हा चर्चेचा विषय ठरला. त्यावर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची डॉ. सुजय विखे-पाटील यांनी घाई केली. मी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. एका निवडणुकीत ते थांबले असते तर फार मोठे नुकसान झाले नसते, असं तांबे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

आम्ही दोघे नगर जिल्ह्यातील आहोत. त्यामुळे शिर्डीच्या साईबाबांप्रमाणे श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला मी त्यांना दिला होता. मात्र, त्यांनी तो ऐकला नाही, असे सत्यजीत तांबे यांनी आज सांगितले. तसंच यंदा निवडणुकीत सुजय निवडून येण्याची शक्‍यता नाही. नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेस आघाडी जिंकणार आहे. दोन्ही ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांना चांगले वातावरण आहे, असं तांबे यांनी यावेळी सांगितले.

नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने आमचा नाईलाज झाला. जर ही जागा काँग्रेसकडे असती तर सुजय हाच एकमेव उमेदवार असते. त्यांना पर्याय नव्हता. तरीही त्यांच्यासाठी आम्ही राहूल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सध्या राज्यातील राजकीय कौल कोणाच्या बाजूने लागतो, किंवा राज्यातील वातावरण काय यावरही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यभर फिरल्यानंतर परिस्थिती बदलल्याचा अंदाज येतो. राज्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागतील. नागपूरमध्ये धक्कादायक निकाल लागून नाना पटोले निश्‍चितपणे निवडून येतील. पुण्यातदेखील काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. गेल्या काही वर्षात काहीजणांनी काँग्रेस सोडली असली तरी काँग्रेसलाच चांगले भविष्य आहे, असा विश्‍वास तांबे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक युवकांना उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच विधानसभांसाठी आतापासूनच तयारीला लागल्याचेही त्यांनी सांगितलं.