‘सुखोई’ बांधणारी ‘एचएएल’ कारखाना काम नसल्याने अडचणीत !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बहुचर्चित राफेलचे देशात अभूतपूर्व उत्साहात स्वागत झाले असताना दुसरीकडे भारतीय हवाई दलासाठी अविरतपणे कार्यरत राहिलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) येथील कारखाना काम नसल्याने अडचणीत आला आहे.

एचएएल कारखान्यात कायमस्वरूपी साडेतीन हजार कामगार आणि दीड हजार अधिकारी असे पाच हजार जण कार्यरत आहेत. काम नसल्याने कंत्राटी स्वरूपातील दोन हजार कामगारांपैकी निम्म्यांना कमी करण्यात आले. तशीच स्थिती पुरवठादारांकडील कंत्राटी कामगारांची झाली आहे. विमान बांधणीची प्रशस्त पायाभूत सुविधा थंडावली आहे. फारसे काम नसताना कायमस्वरूपी सेवेत असणार्‍या हजारो अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वेतनाचा भार ‘एचएएल’वर पडत आहे. सरकार नवीन काम कधी देईल, याची प्रतीक्षा ‘एचएएल’ व्यवस्थापनास आहे.

मिग श्रेणीतील तीन आणि सुखोई विमानांच्या बांधणीचा नाशिक एचएएलकडे मोठा अनुभव आहे. हवाई दलास लढाऊ विमानांची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी दोन दशकांपूर्वी रशियन बनावटीची 272 सुखोई विमाने खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. त्यातील 50 विमाने थेट घेतली गेली. उर्वरित 220 विमाने तंत्रज्ञान हस्तांतर करारान्वये ‘एचएएल’मध्ये तयार करण्यात आली. जवळपास 15 वर्षे हे काम चालले होते. नाशिक ची निकड लक्षात घेऊन सुखोई बांधणीला गती दिली होती. हा कार्यक्रम पूर्ण होऊनही नवे काम न मिळाल्याचा फटका एचएएलसह या कारखान्यावर अवलंबून असलेल्या लहान-मोठया उद्योगांना बसला आहे.