‘सत्ता आली पण पत्ता गेला’, सुमीत राघवनचा उद्धव ठाकरेंना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय, मनोरंजन तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सुमित राघवन याने उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत खोचक टिका केली आहे. एक मतदार म्हणून मला माझी फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर संपन्न होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खूप नाट्यमय घडामोडी घडत होत्या, मात्र त्यांना आता पूर्णविराम मिळाला असून अखेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सर्व घटनांवर अभिनेता सुमीत राघवन व्यक्त झाला असून त्याने ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘सत्ता आली पण पत्ता गेला’, असं म्हणत सुमीतने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

सुमित राघवनने ट्विट केले की, ‘गड आला पण सिंह गेला, पण आज म्हणावं लागेल.. सत्ता आली पण पत्ता गेला, मातोश्री ते सिल्व्हर ओक’, असं ट्विट करत सुमीतने ‘बाळासाहेब ठाकरे’ असा हॅशटॅग वापरला आहे. एक मतदार म्हणून मला माझी फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक रात्रीत सत्ता स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सत्तेविषयीचे सगळे समीकरण मोडीत काढले होते. यानंतर यांच्याविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरु केले आणि आपली सत्ता स्थापन केली. मात्र वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांशी हात मिळवत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केल्याने सुमीतने राघवनने ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

Visit : Policenama.com