राज्यपाल पद मिळण्याआधीच ‘या’ नेत्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे नवी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. सुमित्रा महाजन यांच्याकडे एखाद्या राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. महाजन या महाराष्ट्राच्या राज्यपाल होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत असून काही भाजपा नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. राज्यपाल पद मिळण्याअगोदरच शुभेच्छांचा वर्षाव सुमित्रा महाजन यांच्यावर होत आहे.

सुमित्रा महाजन यांना लोकसभेचे तिकीट नाकारल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाकडून त्यांना एखाद्या मोठ्या राज्याच्या राज्यपाल पदावर नियुक्त केले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही नेत्यांनी अधिकृत घोषणा होण्याआगोदरच त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

भाजपाने सुमित्रा महाजन यांना उमेदवारी नाकारल्याने महाजन यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली होती. तुम्हाला मला उमेदवारी न देण्यास संकोच वाटत असेल, तर मीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेते, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. महाजन यांच्या इंदूर मतदारसंघातून भाजपाने शंकर ललवानी यांना उमेदवारी दिली होती. ललवानी इंदूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.