निधनाच्या बातमीनंतर सुमित्रा महाजन संतापल्या, म्हणाल्या – ‘काहीतरी गडबड, मुंबईतूनच हे वृत्त का आलं?’

इंदूरः पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. मध्यप्रदेशातील इंदूर शहरातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचदरम्यान लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी काल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अनेक माध्यमांनीही याचे वृत्त प्रसारित केले होते. यावर आता सुमित्रा महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील चॅनेलनेच अशा प्रकारचे वृत्त का दिले, यामागे काहीतरी गडबड असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, प्रसारमाध्यमांनी खात्री केल्याशिवाय अशा प्रकारचे वृत्त प्रसारित करणे अत्यंत चुकीचे आहे. माध्यमांमध्ये ही बातमी पाहिल्यानंतर मुंबईतून मला माझ्या अनेक नातेवाईकांचे फोन आले. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली होती. याबाबत त्या म्हणाल्या की, शशी थरुर यांचे ट्विट माझ्या भाचीने रिट्विट केल आणि तिने त्यांना सवालही विचारला, की मी सुमित्रा महाजन यांची भाची आहे, तुम्हाला ही चुकीची बातमी कोणी दिली? असे त्या म्हणाल्या.