यंदा उन्हाळी शिबिरांचे नियोजन नाहीच

पुणे : मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्या की, शहर आणि परिसरामध्ये चला शिबिराला जाऊ असा सूर उमटतो. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे परीक्षा नाही आणि शिबिरही नाही, घरात म्हणजे ज्या शहरामध्ये किंवा गावामध्ये आहात, तेथेच राहण्याची वेळ आली आहे. त्याचा अनेक संस्था, संघटनांना याचा फटका बसला आहे. घरात आजी-आजोबांकडून मिळणारे संस्कार अलीकडच्या काळामध्ये शहरवासियांना विकत घेण्याची वेळ आली आहे.

वर्षभर शाळा, अभ्यास, क्लासमुळे मुलांना खेळ, मौजमस्ती करायला हल्ली वेळच मिळत नाही. त्यामुळे कधी एकदा सुट्टी पडते असेच मुलांना वाटते. उन्हाळी सुट्टीत भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे मुलांचा सुट्टीतील वेळ सत्कारणी लागावा यासाठी विविध संस्था, संघटनांमार्फत जंगल कॅम्प, साहसी उपक्रम, मैदानी खेळ, मल्लखांब, क्रिकेट, फुटबॉल, वैदिक गणित, संस्कार वर्ग आदी विविध कौशल्यपूर्ण शिबिरांचे नियोजन केले जाते. अनेक मंडळी मुलांना संस्कार शिबिराला पाठविल्याचे अभिमानाने सांगतात, तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते, अशी भावना पोक्तमंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

शाळांच्या परीक्षा संपल्याबरोबर मुलांसाठी नवे उपक्रम आणि आराखडे पालकांकडे तयार असतात. अगदी प्राथमिकच्या मुलांना संस्कार, तर उच्च माध्यमिकच्या मुलांसाठी वरच्या वर्गासाठी क्लास, तर दहावी-बारावीतील मुलांसाठी शॉर्ट टर्म कोर्स असे नियोजन असते, ते कोरोनामुळे यावर्षी कोलमडले आहे. इनडोअर आणि आऊटडोअर खेळांचे नियोजन बिघडले आहे. दरवर्षी १ मे ते ५ जूनपर्यंत शिबिरे भरविली जातात. मात्र आता १७ मेपर्यंत लॉकडाउन आहे. त्यामुळे संयोजकांना शिबिरे रद्द करावी लागली आहेत.

पुणे शहर आणि उपनगरामध्ये अनेक संस्थाकडून मुलांसाठी क्लब्ज जंगल कॅम्प, जंगल सफारी, वाइल्ड लाइफ स्लाइड शो, जंगल ट्रेक, ट्रेल, रेपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, रिव्हर क्रॉसिंग घडवून आणतात. तसेच, शिवकालीन युद्धकला स्वसंरक्षण भरवतात. लाठी-काठी, पट्टा, भाला, तलवार, घोडेस्वारी गिर्यारोहणातील साहसी खेळातील जुमरिंग, स्लॅकलाइन खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी धडपड करतात. प्राचीन युद्धकलेच्या प्रशिक्षणाचीही शिबिरांमधून माहिती दिली जाते. फायरिंग, रॅपलिंग, ज्युदो, कराटे, मल्लखांब, मर्दानी खेळ, रायफल शूटिंग, योगा जिम्नॅस्टिक, तलवारबाजीसह क्रिकेट कोचिंग कॅम्पसुद्धा घेतले जातात. बालसंस्कार वर्ग, वैदिक गणित, योग, पॉप पेंटिंग, क्ले आर्ट, अभिनय प्रशिक्षण शिबिरे अशी मुलांसाठी छंद जोपासण्याची, व्यक्तिमत्त्व विकासाची पर्वणी असते.

हडपसरमधील शिवसमर्थ बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मनिषा वाघमारे यांनी सांगितले की, एप्रिल-मे महिन्यात पहिली ते चौथीतील मुलांसाठी मोफत संस्कार शिबीर घेतले जातात. या शिबिरामध्ये शब्दकोडी, शब्दखेळ, चित्रकला, हस्तकला आणि पझल्स असे उपक्रम राबविले जातात. उन्हाळा असल्याने दररोज सकाळी 9 ते 11 या वेळेत दोन तास येतात. या शिबिरामध्ये दरवर्षी 25 ते 30 असते. त्यांच्यासाठी पोहे, राजगिरा लाडू, खारीक असा खाऊ मुलांना दिला जातो. मुलांची नोंदणी करून घेतली जाते. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा निश्चित कालावधी नसल्याने शिबिराचे नियोजनच केले नाही.