कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांना साक्षीसाठी बोलावण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात शरद पवार यांच्याकडे आणखी माहिती असल्यास ती त्यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर स्वत: येऊन जमा करावी अशी मागणी करणारा अर्ज एका व्यक्तीने चौकशी आयोगाकडे केला आहे. तसेच शरद पवार यांना आयोगाने समन्स बजवावा असे अर्जात म्हटले आहे. चौकशीबाबत राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद शांत होत नाही तोच पवारांनाच समन्स बजावण्याची मागणी करणारा अर्ज दाखल झाला आहे. आयोगाच्या पुढील तारखेला यावर सुनावणी होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे, त्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. तसेच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी या पार्श्वभूमीवर वेगळे वातावरण निर्माण केल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. यावरून त्यांच्याकडे या प्रकरणाची अधिक माहिती असल्याचे दिसते. जी त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर सादर केली नाही. त्यामुळे न्याय होण्याच्या दृष्टीने आयोगाने शरद पवार यांना समन्स बजावावा व पवारांनी संबंधित माहिती आयोगाकडे जमा करावी, अशी मागणी करणारा अर्ज सागर शिंदे यांनी चौकशी आयोगाकडे केला आहे.

या प्रकरणाची चौकशी न्या. जे.एन. पटेल यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोग करीत आहे. सागर शिंदे यांचा अर्ज आयोगाकडे दाखल झाला आहे. आयोगाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या दिवशी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे आयोगाचे वकील अ‍ॅड. आशिष सातपुते यांनी सांगितले आहे.

You might also like