#Meetoo : एमजे अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रिया रमानींना समन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – #मी टू अंतर्गत माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांना पटियाला हाऊस कोर्टाने आरोपी म्हणून समन्स पाठवले आहेत. अब्रु नुकसानीच्या प्रकरणामध्ये त्यांना 25 फेब्रुवारी रोजी पटियाला हाऊस कोर्टात सादर व्हावे लागेल. # मी टू या मोहिमे अंतर्गत मंत्री एम जे अकबर यांच्यावर काही महिला पत्रकरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद

एमजे अकबर यांनी पत्रकार प्रिया रमानी यांच्या विरोधात गेल्यावर्षी पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यांनी अब्रुनुकसानीशी संबंधित आयपीसीच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत प्रिया यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यात आरोप सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तक्रारीत म्हटले आहे की, लैंगिक शोषणाच्या आरोपांनी अकबर यांची बदनामी तर झालीच पण त्याचबरोबर अनेक वर्षांच्या परिश्रमाने मिळवलेल्या सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेलाही हानी पोहोचली आहे.

सत्य हेच शस्त्र : प्रिया रमानी

प्रिया रमानी यांनी ट्विटरवर स्टेटमेंट देत म्हटले आहे की, अनेक महिलांनी खासगी आणि व्यावसायिक जीवन धोक्यात घालत अकबर यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. प्रिया म्हणाल्या की, अब्रुनुकसानीच्या आरोपांच्या विरोधात लढायला त्या तयार आहेत. कारण सत्य हेच त्यांचे एकमेव शस्त्र आहे. आरोपांचा संबंध राजकीय कटाशी जोडणे वेदनादायी आहे. पण माझ्या विरोधात अबरुनुकसानीचा दावा दाखल करून त्यांनी स्टँड स्पष्ट केला आहे. त्यांना घाबरवून शोषण केलेल्या महिलांना शांत बसवायचे आहे.

१२ महिलांनी लावले होते अकबर यांच्यावर आरोप

प्रिया रमानी यांच्यानंतर गजाला वहाब, शुमा राहा, अंजू भारती आणि शुतापा पॉलसह 12 महिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यापैकी कोणीही अकबर यांच्या विरोधात तक्रार केलेली नाही.