वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स; टेलिफोन टॅपिंग प्रकरणात जबाब नोंदविण्यात येणार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे लोकांचे टेलिफोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे. मुंबईच्या सायबर विभागाने हे समन्स बजावले असून त्यांना २८ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय टेलिग्राफी अ‍ॅक्ट कलम ३०़ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३ व ४६ तसेच ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट ०५ नुसार हे समन्स बजावण्यात आले आहे.
एसआयडी मध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोपी रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या मदतीने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठविले आहे. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. एसआयडीमध्ये कार्यरत असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे. राष्ट्रविघातक कृत्य करणार्‍यांच्या फोन टॅपिंगची परवानगी घेऊन रश्मी शुक्ला यांनी मंत्र्यांचे फोन टॅप केले. तसेच राज्यात भाजपचे सरकार यावे, यासाठी काही आमदारांना धमकावले़ अपक्ष आमदारांना फोन करुन भाजपला पाठिंबा देण्यासाठी धमकाविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.