पुणे : ‘सनसिटी’ – ‘प्रयेजा सिटी’ला जोडणारा रस्ता लवकरच होणार खुला : नगरसेविका मंजुषा नागपुरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 25 सप्टेंबर 2019 रोजी पुण्यात अभूतपूर्व असा पाऊस झाला. सदर पावसामुळे, पुणे-बेंगलोर हाय-वे खालील ओढ्याला पूर येऊन, तेथील सनसिटी व प्रयेजा सिटी ला जोडणारा रस्ता वाहून गेला. सदर वाहून गेलेला रस्ता हा सनसिटी व प्रयेजा सिटी मार्गे वडगाव व धायरी ला जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. रस्ता वाहून गेल्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीचा ताण सनसिटी रस्त्यावर येत होता. ही गोष्ट लक्षात येताच, पूर ओसरताच नगरसेविका नागपुरे यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निदर्शनास वरील मुद्दा आणून दिला व लक्ष घालण्याची विनंती केली.

गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता चिटणीस यांना भेटून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगून त्यांना लवकर NOC व डीमार्केशन देण्याची विनंती करण्यात आली. जेणेकरून मनपा कडून या रस्त्याच्या कामाची सुरुवात करता यावी. सर्व गोष्टींची पूर्तता करून युद्धपातळीवर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले व ते येत्या सोमवार पर्यंत पूर्णत्वास जाईल आणि रस्ता पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होईल असे नगरसेविका मंजुषा नागपुरे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग कार्यकारी अभियंता डोंबे यांनी केलेल्या संयुक्त पाहणीनंतर म्हटले.

सदर रस्ता पूर्ण झाल्याने सनसिटी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. नॅशनल हायवे चे अधिकारी, पुणे मनपा यांच्याशी साधलेल्या समन्वयामुळे आणि गिरीश बापट व आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या सहकार्यातून कामाला गती मिळाली, असे नागपुरे म्हणाल्या.

Visit : policenama.com