रविवारमुळे प्रेमिकांचा ‘व्हॅलेंटाइन्स’ लग्नाचा मुहूर्त हुकला; नोंदणी कार्यालयाला सुटी असल्याने विवाह नोंदणी बंद राहणार ?

पुणे : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असे म्हणत प्रेमिकांकडून 14 फेब्रुवारी लग्नाची तारीख मुक्रर केली जाते. मात्र, यावर्षी विवाहमुहूर्त नसले तरी, अनेक लग्नाळू प्रेमिक नोंदणी कार्यालयात जाऊन कार्यभाग उरकतात. १४ फेब्रुवारी रोजी अर्थात ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला लग्न बंधनात प्रेमाच्या नात्याची मोहोर उमटवतात. या दिवशी लग्नमुहूर्त नसल्यास अनेक जोडपी विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करून तो दिवस अविस्मरणीय करतात. परंतु यंदा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला रविवारची सुट्टी असल्याने विवाह नोंदणी कार्यालय बंद राहणार आहे. व्हॅलेंटाइन डे रविवार येत असल्याने शासन विवाहनोंदणी कार्यालय सुरू ठेवणार का, अशी विचारणा अनेक प्रेमिकांकडून केली जात आहे.

एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून जगभरात फेब्रुवारी महिन्याकडे पाहिले जाते. फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ तारीख हा आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात विवाह करण्याकडे अनेक जोडप्यांचा कल असतो. त्यातही ‘व्हॅलेंटाइन्स’ दिनी विवाह बंधनात अडकून तो क्षण अविस्मरणीय करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. त्यासाठी काही जण विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन साध्या पद्धतीने लग्न करतात. तर काही जण सभागृहात थाटामाटात लग्न करतात. मात्र, यंदा व्हॅलेंटाइनच्या दिवशी रविवार आल्याने विवाह नोंदणी कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे जी जोडपी साध्या पद्धतीने विवाह करण्यास इच्छुक होती त्यांच्यासाठी हा मुहूर्त टळला आहे, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. तरीसुद्धा अनेकांनी त्यावर पर्याय तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा काढीव तारखा काढून विवाह करण्याचे ठरविले आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच ७ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत अनेक जोडपी विवाह बंधनात अडकली होती. तर यंदाच्या वर्षी व्हॅलेंटाइन आठवड्याची सुरुवातही रविवार आणि शेवटही रविवारने होत असल्याने या वर्षी या आठवड्यात नोंदणी पद्धतीने होत असलेल्या विवाह कमी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या व्हॅलेंटाइन आठवड्यात नोंदणी विवाहात घट झाली असून, यंदा अत्यल्प जोडपी नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकली आहेत.

बारामतीमधील (भटजी) अविवाश कुलकर्णी म्हणाले की, मागिल वर्ष कोरोनाच्या संकटात गेले, अनेकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे बहुतेकांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाली आणि लग्नसमारंभ बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने होऊ लागले आहेत. कोरोना संपला नाही, त्यामुळे सावधानता बाळगत वर्षभर रखडलेले विवाह थाटामाटात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेमिकांना मात्र व्हॅलेंटाईनचा मुहूर्त साधण्यात अडचणी आल्या आहेत.