“पाकिस्तानशी न खेळण्यापेक्षा त्यांच्यासोबत खेळून त्यांना हरवा”

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्याची मागणी देशभरातून होत आहे. तर क्रिकेट जगतातही त्यावर परिणाम होताना दिसत आहे. आता होणाऱ्या वर्ल्डकपमध्येही पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट सामना खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी या मागणीला विरोध केला आहे.

जर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळला नाही, तर नुकसान भारताचंच होईल, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. २०१९ च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला बाहेर ठेवण्यास अन्य देश सहमत झाले नाहीत तर भारताचेच नुकसान होईल, असं गावस्कर यांनी सांगितलं आहे.

विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. भारताने तो सामना खेळला नाही तर पाकिस्तानला फुकटचे २ गुण जातील. हे २ गुण त्यांना देण्यापेक्षा त्यांच्याविरोधात सामना खेळा आणि त्यांना हरवा, हे उत्तमच, असं गावस्कर यांनी सांगितलं.

दरम्यान, एक दिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जूनला सामना होणार आहे. बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय यांनी सीईओ राहुल जोहरी यांना आयसीसीला पत्र पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारीला ICC च्या कार्यक्रमात राहुल जोहरी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करण्याची शक्यता आहे. तसंच पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढावं, अशी मागणीही ते वेळी करू शकतात.