शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच बोलले भाजप खासदार अभिनेते सनी देओल !

पोलीसनामा ऑनलाइन – शेतकरी संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या 3 नव्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी उद्या (मंगळवार, दि. 8 डिसेंबर 2020) भारत बंद पुकारण्यात आला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांकडून गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यात नेते, खेळाडू, कलाकार अशा अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यावरून काही अफवादेखील पसरताना दिसत आहे. अशात आता भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल (Sunny Deol) यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं त्यांनी सांगितलं आहे. काहीजण या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

सनी देओल यांनी इंस्टावरून पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, माझी सगळ्यांना एकच विनंती आहे. या मुद्द्यांमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. कारण आपापसात चर्चा करून या मुद्द्यांवर तोडगा निघणार नाही. मलादेखील चांगलंच माहीत आहे की, काही जण या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आंदोलनात बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येचं काहीही देणं-घेणं नाही. ते केवळ आणि केवळ स्वत:चा विचार करत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

ते म्हणतात, दीप सिद्धू, जे निवडणुकीच्या वेळी सतत माझ्यासोबत होते, पण आता नाहीत. ते जे काही वक्तव्य करत आहेत किंवा जी कृती करत आहेत ते स्वत: त्यांच्या मनानुसार करत आहेत. यात माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. मी आणि माझा पक्ष शेतकऱ्यांसोबत आहोत आणि कायम त्यांच्या पाठीशी असेन. आपल्या सरकारनं कायम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळं मला विश्वास आहे, सरकार त्यांच्याशी नीट चर्चा करून योग्य तो तोडगा काढेल.

सनी देओल यांनी ट्विट करत पहिल्यांदाच शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे. याआधीही त्यांनी यावर काहीही टिप्पणी केली नव्हती. आंदोलनाच्या 10 दिवसांनंतर केलेलं हे ट्विट सध्या सोशलवर चर्चेत आलं आहे.