4000 रुपयांची लाच स्विकारताना महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचचा अधिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – वाहन जप्तीच्या कारवाईवर स्टे ऑर्डर देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच स्विकारताना महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अधिक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पडकले. ही कारवाई शुक्रवार (दि. ३०) करण्यात आली. घनश्याम आसाराम सोनवणे (वय-५० रा. शिव कॉलनी, प्लॉट नं 19, मारुती पार्क, जळगाव) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार यांनी फायनान्स कंपनीकडुन कर्ज घेवून वाहन घेतलेले होते. कर्जाचे हप्ते थकीत झाल्याने फायनान्स कंपनीने वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होती. तक्रारदार यांनी त्यांचे वाहन जप्त न होण्यासाठी स्टे ऑर्डर मिळविण्याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव यांचेकडे अर्ज सादर केला होता. स्टे ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे सोनवणे याने 4 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता सोनवणे याने 4 लाचेची मागणी करून लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक जी. एम. ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –