कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची उचलबांगडी करण्यात आली आहे़ त्यांची येरवडा येथे बदली करण्यात आली आहे. कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद हे शुक्रवारी कोल्हापूर दौर्यावर आले. त्यांनी कळंबा कारागृहात गांजा, मोबाईल सापडल्याची चौकशी सुरु केली.
त्या अगोदर कारागृहात गांजा, मोबाईल कारागृहात सापडल्यानंतर शेळके यांना कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी पुण्याला बोलावून घेतले होते. रामानंद यांनी शेळके यांच्याकडे घडल्या प्रकाराबाबत चौकशी केली होती.
चारचाकी वाहनातून आलेल्या दोन तरुणांनी सोमवारी मध्यरात्री तीन गठ्ठे कारागृहाच्या सरंक्षण भिंतीवरुन आत फेकल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात आढळून आले होते. हे गठ्ठे मंगळवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षकांना मिळाले. या गठ्ठ्यात पाऊण किलो गांजा, १० नवे मोबाईल हँडसेट, पेनड्राईव्ह, मोबाईल कॉड आदि साहित्य सापडले होते. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरु झाली आहे.
शेळके यांच्यावर यापूर्वी २०१९ मध्ये कारवाई झाली होती. वाई येथील सिरीयल किलर डॉ. संतोष पोळ याने कळंबा कारागृहात पिस्तुल घेऊन व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल केली होती. या प्रकरणात शेळके यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, चौकशी समितीने शेळके यांच्यासह १५ जणांना क्लिन चिट दिल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली होती.