पोलिस निरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने आमगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह चौघांना जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी शनिवारी (दि. 22) तडकाफडकी निलंबित केले आहे.

ठाणेदार सुभाष चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, पोलीस शिपाई अरूण उईके असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, चोरीच्या प्रकरणात राजकुमार अभयकुमार धोती (30, रा. कुंभारटोली) याला अटक केली होती. परंतु पोलीस कस्टडीत असतांना शनिवारी (दि. 22) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास त्यााच मृत्यू झाला. या मृत्यूला आमगाव पोलीस ठाण्य़ातील पोलीस निरीक्षकासह चौघे कारणीभूत ठरवून त्यांना निलंबित केले आहे.

आमगाव पोलिसांनी पोलिसांची प्रतिमा मलीन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे पोलीस अधिनियम 1951 चे कलम 25 व महाराष्ट्र पोलीस शिक्षा व अपील अधिनियम 1956 मधील नियम 3 च्या पोटनियम (1-अ) (एक) (ब) अन्वये पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी चौघांना निलंबित केले आहे .