8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर दिले गरम विळ्यानं चटके, पोटदुखीच्या आजारातून बरं करण्यासाठी केलं कृत्य

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मेळघाटात एक अघोरी प्रकार समोर आला आहे. पोटदुखीच्या आजरातून बरे करण्याच्या नावाखाली ८ महिन्यांच्या बाळाला गरम विळ्यानं चटके दिल्याची घटना घडली आहे. या घटनेची भरारी पथकाला माहिती मिळताच त्यांनी या चिमुरड्याला पुढील वैद्यकीय उपचारसाठी हलवलं आहे. आई-वडिलांना विचारलं असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा या गावामध्ये जाणू सज्जू तोटा हिच्या ८ महिन्यांच्या बाळास पोटफुगीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्या चिमुरड्यास आई-वडिलांनी भुमकाकडे (भगतबुवा) याच्याकडे घेऊन गेले. भुमकान चिमुरड्याला संपूर्ण पोटावर गरम विळ्याने चटके दिले. या प्रकाराला डंबा असं म्हटलं जातं. दरम्यान, याची खबर भरारी पथकाला लागताच त्यांनी ८ महिन्यांच्या श्यामला वैद्यकीय उपचारसाठी हलविले. या सगळ्या घटनेची विचारणा आई-वडिलांना केली असता हा प्रकार समोर आला. त्यामुळे आदिवासी समाज आज सुद्धा अंधश्रद्धा जपतो आहे, हे पुन्हा आज यानिमित्ताने उघड झालं आहे.

यापूर्वी देखील असाच एक प्रकार घडला होता. हतरु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूती झाली. तिने २ किलो ८०० ग्राम वजनाच्या बालकाला जन्म दिला होता. दवाखान्यातून सुट्टी घेऊन गेल्यावरती या बालकाच्या पोटावर फुगार आल्याने त्यांनी बालकाला गावातील भूमक्याकडे (भगत) नेले. या भूमक्याने बालकाच्या पोटावर गरम सळईने चटके दिले होते. त्यामुळे बालकाची प्रकृती बिघडली होती. बालकाला चुरणी येथील आरोग्य केंद्रात उपरासाठी दाखल केले असता २० मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. तर याच बुवा बाजीमुळे एका गर्भवती महिलेला देखील आपल्या प्राणाला मुकावे लागलं होत. मेळघाटामध्ये कुपोषणाची मुख्य समस्या असताना येथील आदिवासीयांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रशासनाला पाहिजे तस यश आलं नसल्याचं, मत अंनिसचे हरीश केदार यांनी म्हटलं आहे.