अंधश्रध्देचा बाजार ! ‘कोरोना’च्या संकटात देखील घरोघरी महिलांच्या गळयात ‘हळकूंड’

 पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच सांगलीमध्ये घरोघरी महिलांच्या गळ्यात हळकुंड घालून अंधश्रद्धेचा बाजार मांडण्यात आला आहे. देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र वाढून 22 मोती गळाले असून आता 22 हजार महिलांचे कुंकूही पुसले जाणार असून यापासून सौभाग्य वाचण्यासाठी गळ्यात पांढर्‍या दोर्‍यात बांधून हळकुंड बांधण्याची प्रथा महिलामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहे. या अंधश्रध्देला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही खतपाणी मिळत आहे.

देवीच्या अंगावरील मंगळसूत्र वाढले असून त्यामधील 22 मणी जमिनीवर पडले आहेत. हा अपशकुन असून याचे परिणाम म्हणून कोरोनाच्या महामारीत 22 हजार महिलांना वैधव्य प्राप्त होण्याचे भाकीत केले जात आहे. हा गैरसमज महिला वर्गामध्ये गेल्या चार दिवसापासून जोरदार फैलावला असून सौभाग्य वाचविण्यासाठी उपायही सुचविण्यात आला आहे.

सौभाग्य वाचविण्यासाठी पांढर्‍या दोर्‍यात बांधलेले हळकुंड गळ्यात बांधले तर यातून पती वाचू शकतो असा प्रसार महिलांच्या सोशल मीडियातून होत आहे. अनेक महिला धोका नको म्हणून गळ्यात हळकुंड बांधून वावरत आहेत. कोरोना प्रसारामुळे होत असलेली हानी पाहून मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या महिला वर्गाला यामध्ये गोवण्यासाठी अशी माहिती पसरविण्यात आली आहे. या अंधश्रध्देचे संदेश प्रसारित करणार्‍यावरही करडी नजर ठेवून असे संदेश प्रसारित करणार्‍यावर आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाईची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

You might also like