संततीसाठी अडीच वर्षाच्या मुलाचा दिला बळी !

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी भागातील रिठाला येथील एका महिलेने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन संतती प्राप्तीसाठी एका अडीच वर्षाच्या मुलाचा बळी देण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पूजा नावाच्या महिलेला अटक केली आहे. स्वत:ची कुस उजळावी म्हणून तिने दुसरीची कुस उजाड केली आहे.

रोहिणी भागातील रिठाला येथील एका इमारतीत राहणारा अडीच वर्षाचा मुलगा सकाळपासून बेपत्ता झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. परंतु, तो कोठेही दिसला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी घराच्या आजूबाजूचा सर्व परिसर धुंडाळला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा मुलगा इमारतीच्या बाहेर गेला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी घराजवळ पाहणी केली. तेव्हा इमारतीच्या मागच्या बाजूला एक पोते आढळून आले.

पोते उघडून पाहिल्यावर त्यात या अडीच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या मुलाच्या घराजवळील सर्व लोकांकडे चौकशी केली. त्यात पूजा हिची चौकशी करायला सुरुवात केली. तिचे बोलणे, वागणे पोलिसांना संशयास्पद वाटू लागले. पूजा हिच्या लग्नाला अनेक वर्षे झाली असूनही तिला मुलगा नव्हता. मुलाच्या प्राप्तीसाठी ती एका तांत्रिकाकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिने काळी जादू व तंत्र मंत्र करण्यास सुरुवात केली होती.  त्याच्या सांगण्यानुसार तिने संधी मिळताच या अडीच वर्षाच्या मुलाचा बळी दिला. त्यानंतर मृतदेह लपविण्यासाठी घराच्या मागच्या बाजूला फेकून दिला होता.  पोलिसांनी पूजाला अटक केली असून तांत्रिकाचा शोध घेण्यात येत आहे.