भोसरीत पगार न दिल्याने सुपरवायझरची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन – बांधकाम साईटवर ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साईटवर काम करणार्‍या सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई)च्या परिसरात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली.

रवींद्र सिंग असे गळफास घेऊन मृत पावलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र सिंग हे सीएमई येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करीत होते. त्यांनी गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनस्थळावर एक चिठ्ठी मिळून आली आहे. यामध्ये ठेकेदाराने पगार न दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. रवींद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.