Nagpur News : मजुरांनी केली वृध्द सुपरवायजरची हत्या, पोलिसांनी धावत्या बसला अडवून तिघांना केली अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नाईट ड्यूटी जायला सांगितल्याचा राग आल्याने 3 मजूरांनी मिळून एका वृध्द सुपरवायजरची हत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगरमध्ये गुरुवारी (दि. 18) रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना पोलिसांनी धावत्या बसला अडवून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

सम्हारू अवधू हरिजन (वय 60 रा. मुळचा खुरमाखास, रुद्रपूर (जि.देवरिया, उत्तर प्रदेश ) खून झालेल्या सुपरवायजरचे नाव आहे. तर दिनेशकुमार मुन्ना लाला (वय 23) ,बजरंगी लालचंद्रप्रसाद गाैतम (वय 21) आणि सुशीलकुमार दीपचंद गाैतम (वय 19 तिघेही रा. मोहम्मदपूर पुहाया, जि.शहाजानपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी विक्रांत श्रीकिशन प्रसाद यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सम्हारु यांच्या संजिवा नावच्या भाच्याने मेट्रोच्या वायरिंगचे कंत्राट घेतले. त्यामुळे 2018 पासून ते नागपुरात राहायला आले होते. कामावरच्या मजुरांच्या हजेरी लावून त्यांचे पगार काढण्याचे काम सम्हारू करत होता. सम्हारू हे देखील आरोपी दिनेशकुमार, बजरंगी, सुशीलकुमार, सोबत मजुरांच्या झोपड्यात लोकमान्यनगरमध्ये राहत होते. गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास सम्हारूने या तिघांना कामावर (नाईट ड्यूटी) वर जाण्यास सांगितले. थकूनभागून आताच कामावरून परत आल्याचे सांगून आरोपींनी नाईट ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे सम्हारू त्यांच्यावर ओरडला. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी त्याच्यासोबत वाद घालून त्याला मारहाण केली. आरोपी दिनेशकुमारने जवळचा चाकू काढून सम्हारूच्या छातीवर वार केला. त्यामुळे सम्हारूचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आरडाओरड ऐकून आजुबाजुची मंडळी धावली. तोपर्यंत आरोपी पळून गेले. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. घटनेनंतर आरोपी जबलपूरला जाण्यासाठी बसमध्ये बसले होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे कॉल लोकेशन काढून त्यांना कामठी मार्गावर धावत्या बसला अडवून ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्यांना अटक केली.