सुपरवायझरची ‘या’ कारणावरुन केली हत्या ; चौघे पोलिसांच्या जाळ्यात

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कामचुकारपणा केल्याने त्यांचा दोन महिन्यांचा पगार थांबविला गेला होता. त्यामुळे ते रागावले होते. त्यातूनच त्यांनी कट रचून सुपरवायझरला चोरीच्या बॅटरीज पाहण्यासाठी बोलावले. तेव्हा सुपरवायझरने भेटायला जाताना एका मित्राला फोन लावून तो सुरुच ठेवायला सांगितले. या कॉलवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. हर्षद दुगड असे खून झालेल्या सुपरवायझरांचे नाव आहे. पोलिसांनी गोपीचंद घुले आणि दशरथ साबळे यांच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले की, कल्याणमधील एका खासगी कंपनीत हर्षद दुगड हे सुपरवायझर म्हणून काम करत होते. गोपीचंद  आणि दशरथ हे कामगार म्हणून काम करत होते. दुगड यांनी या दोघांच्या कामचुकारपणाची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. त्यामुळे कंपनीने या दोघांचा २ महिन्यांचा पगार थांबविला होता. पगार थांबविला गेल्याने दोघांना दुगड यांच्याविषयी राग होता. त्यांनी दुगड यांना आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंड परिसरात चोरीच्या बॅटरीज आहेत, त्या पाहण्यासाठी बोलावले. दुगड तेथे जाताच त्यांनी अन्य दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुगड यांचा गळा आवळून खून केला. आणि डम्पिंग ग्राऊंडच्या नाल्यात त्यांचा मृतदेह टाकून वरुन कचरा टाकून दिला.

हर्षल दुगड हे घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली. हर्षद यांच्या कॉल रेकॉर्ड तपासात असताना त्यांनी शेवटी एका मित्राला फोन लावल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या मित्राशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी हर्षदचा फोन आला होता. त्याच्याकडील रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर कॉलच्या शेवटी दुगड यांचा गोपी गोपी…. असा ओरडतानाचा आवाज ऐकायला येतो व फोन होल्डवर जातो.

हे रेकॉर्डिंग व फोनचे लोकेशनच्या आधारे तपास केल्यावर कंपनीत गोपीचंद आणि दशरथ यांच्याविषयीच्या तक्रारीची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी दोघांना अटक केली असून अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.  दुगड कुटुंबियांना मात्र, हर्षद यांना जर या दोघांविषयी संशय होता तर ते कोणाला काहीही न सांगता त्या दोघांच्या सांगण्यावरुन एकटेच का गेले हा प्रश्न आता कायमचा सतावत राहणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त