दिल्लीत हालचालींना वेग, सुप्रिया सुळे विरोधी पक्ष नेतेपदी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान या भेटीतील चर्चेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार असल्याची चर्चा या भेटीनंतर समोर आली होती. लोकसभा निवडणूकीतील कॉग्रेसच्या पराभवानंतर लोकसभेत विरोधी पक्ष नेते पद नेमंक कोणाच्या वाट्याला येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण विरोधी पक्षनेते पद मिळविण्याइतपतही जागा कॉंग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेते पद मिळविण्याएवढ्या जागा होतील. मात्र असं झालं तर विरोधी पक्षनेतेपद सुप्रिया सुळे यांना दिले जाणार का यासाठी खटाटोप सुरु असल्याची चर्चा होती.

राष्ट्रवादी विलीन करण्याच्या चर्चांना पुर्णविराम
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधींनी घेतलेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात सुरु असलेल्या चर्चांना शरद पवार यांनी पुर्णविराम दिला आहे. विलीनीकरणासंदर्भात आमच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. असं त्यांनी सांगितलं.