छगन भुजबळ यांच्या स्थानिक विकास निधीतून येवला, नगरसुल व लासलगाव येथील कोविड रुग्णालयांना प्रत्येकी 20 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा पुरवठा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी येवला मतदारसंघात येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी आलेल्या रुग्णांना प्राथमिक स्वरूपात ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी २० या प्रमाणे ६० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देण्यात आले आहे.

येवला मतदारसंघात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे ६७, ग्रामीण रुग्णालय नगरसूल येथे ३० व ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे ३० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर या तीनही ठिकाणी एकूण १२ व्हेन्टीलेटर बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी केवळ मतदारसंघातील नाही तर परिसरातील इतर ठिकाणाहून दाखल झालेल्या अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या तीनही रुग्णालयांसाठी ६० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची व्यवस्था करून दिलेली आहे.

कोरोनाबाधित रुग्णासाठी सुरुवातीच्या काळात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ हे उपकरण अतिशय प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरमुळे सद्या कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने आवश्यक असणारी ऑक्सीजनची काही प्रमाणात गरज भागवण्यास मोठी मदत होते. त्यामुळे येवला उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय व लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल होणाऱ्या कोरोना रूग्णाना याचा अधिक फायदा होणार आहे.