Coronavirus : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी भारताकडून ब्रिटनला ‘एवढ्या’ लाख पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांचा ‘पुरवठा’

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाने नागरिकांना संकटात टाकले आहे. त्यामुळे अनेक देश हतबल झाले असून आरोग्य यंत्रणेची दुर्दैशा उडाली आहे. त्यामुळे एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यानुसार कोरोनाच्या लढ्यासाठी भारताने ब्रिटनला 30 लाख पॅरासिटेमॉलच्या गोळ्या पाठविल्या आहेत. संबंधित गोळ्यांचा पुरवठा आज त्यांना मिळणार असून मदतीसाठी ब्रिटनने भारताचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या लढ्यासाठी भारताने मदत केल्यामुळे ब्रिटनचे दक्षिण आशियाविषयक मंत्री लॉर्ड तारिक अहमद यांनी आभार मानले आहेत. तसेच ही मदत दोन्ही देशांतील संबंधांसाठी महत्त्वाची असून सहकार्याचे प्रतीक आहे. जागतिक पेचप्रसंगाच्या काळात दोन देश एकमेकांना मदत करू शकतात हे यातून स्पष्ट झाले आहे. भारत व ब्रिटन हे दोन देश कोरोनाच्या प्रतिबंधासाठी एकमेकांना मदत करतील यात शंका नाही.

ब्रिटनचे जे लोक भारतात आहेत त्यांना परत नेण्यासाठी सरकारने ज्या विमानांची व्यवस्था केली आहे त्याच विमानांमधून या गोळ्या व इतर वैद्यकीय मदत पाठवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.ब्रिटनचे नागरिक हे गोवा, मुंबई, दिल्ली, अमृतसर, अहमदाबाद, तिरुअनंतपूरम, कोची, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, बेंगळूरु येथून पुढील आठवडयात विमानाने मायदेशी जाणार आहेत. ब्रिटनमध्ये गेल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार असून ब्रिटनचे 21 हजार नागरिक सध्या भारतात आहेत.