Coronavirus Impact : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर अशा महानगरांमधे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे असे विधीमंडळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सुचविले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत. पण काही बाबतीत आणखी तपशिलात जावून उपाययोजना करण्याची गरज आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवायचा असेल तर, बाजारसमित्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याची नितांत गरज आहे. माथाडी कामगारांकडे ओळखपत्र आहेत. पण, व्यापारी, वाहतुकदार, खरेदीदार हे बाजारसमित्यांमध्ये येऊ शकतील हे सुनिश्चित करावे लागेल. त्यासाठी त्यांना बाजारसमित्यांच्या माध्यमातून ओळखपत्र द्यावे लागेल. बाजारसमित्यांमध्ये थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, स्वच्छता यांची व्यवस्था केली तरच हिंमत येईल. वाहनचालक, वाहक यांना ओळखपत्र देतानाच त्या भागातील पोलीसांनासुद्धा तशा सूचना द्याव्या लागतील. सध्या बाजारसमित्यांकडे येणारी वाहने अडविली जात आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर सारख्या महानगरांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या उपाययोजना आवश्यक आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सुचविले आहे.