कारागृहातून सुटलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या बॅनरवर शिवसेना नेत्याचा फोटो, राजकीय चर्चेंना उधाण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण डोंबिवली महापालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येप्रकरणी तब्बल 3 वर्षे न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे माजी नगसेवक महेश पाटील यांची सुटका झाल्यानंतर कल्याण आणि ठाण्यात त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी मोठे बँनर्स लावले असून कल्याण शीळ रस्त्यावर एका ठिकाणी भल्या मोठ्या बॅनरवर तर वेलकम भाई असे लिहले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फोटोही आहे. कोठडीतून सुटून आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या बॅनरवर शिवसेना नेत्यांचे फोटो झळकल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी 2018 मध्ये एका टोळीला दिली होती. त्यानंतर एका लुटीच्या प्रकरणात ठाणे ग्रामीण पोलिसांनी काही आरोपीना जेरबंद केले होते. त्या आरोपींपैकी एकाने खुलासा केल्यानंतर कुणाल पाटील हत्या प्रकरण उजेडात आले होते. कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी घेतली होती, असे यातील एका आरोपीने सांगितले होते. त्यानंतर या सुपारी प्रकरणात तत्कालीन भाजप नगरसेवक महेश पाटील आणि त्यांचे सहकारी सुजीत नलावडे, विजय बाकडे यांना अटक केली गेली होती. त्यानंतर आता तब्बल 3 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने पाटील यांचा जामीन अर्ज काही अटींसह मंजूर केला आहे.