अण्णा हजारेंना समर्थकांनी करून दिली ‘या’ प्रकरणाची आठवण

पोलिसनामा ऑनलाईन – शुक्रवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थात ती निष्पळ ठरली आणि हजारे आंदोलनावर ठाम राहिले. या भेटींवर हजारे यांच्या समर्थकांमध्ये मात्र चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( anna hazare) यांचे आंदोलन जवळ आलेले असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात का, यावरून समर्थकांमध्ये मतभेद आहेत. अण्णांनी ( anna hazare) या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असा एक मतप्रवाह आहे तर काही मंडळींनी भेटीचे समर्थन केले असले तरी सावध रहावे असा सल्लाही दिला आहे. गंगा शुद्धीकरण आंदोलनासाठी प्राणत्याग केलेले जे. डी. अग्रवाल यांच्या उपोषणाची आणि त्यात त्यांचा बळी गेल्याची आठवणही करून देण्यात आली आहे.

दरम्यान, दारूबंदी, व्यसनमुक्तीच्या कामाच्या निमित्ताने हजारे यांच्याशी जोडले गेलेल्या हेरंब कुलकर्णी यांनी चर्चेला तोंड फोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘भाजपाचे नेते अण्णांची भेट घेत आहेत. अण्णांनी त्यांना भेट देता कामा नये. एक तर अण्णांच्या सर्व मागण्या या केंद्राशी संबंधित आहेत त्यामुळे राज्यातील नेत्यांचा संबंध काय? दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांनी भेटायला यावे. याच मागण्यांवर पूर्वी हजारे यांनी उपोषण केले तेव्हा मिटवायला हेच महाराष्ट्रातील नेते होते. त्या अश्वासनांची अंमलबजावणी का झाली नाही? असे अण्णांनी त्यांना विचारून दूर करायला हवे. अण्णांना सतत भेटून अण्णा आमचे ऐकतात, असा संदेश देत अण्णा हजारे हे भाजपाचे आहेत, हा विकृत प्रचार करत आंदोलनाची धार कमी करायचा यामागे सुप्त हेतू असतो. अण्णांना हे कळत का नाही? जे पंतप्रधान पत्राला उत्तर न देता सतत अवमानित करतात. समजावूनच सांगायचे तर तुमच्या दिल्लीतील नेत्यांना सांगा, असे अण्णांनी त्यांना खडसावले पाहिजे.”

हजारे यांच्या कायदेशीर सल्लागारांपैकी एक अॅड. श्याम आसावा यांनी मात्र, वेगळे मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘अण्णांना कोणीही सहज भेटू शकते कारण त्यांचे दार सर्वांसाठी खुले आहे. पूर्वी अण्णांचे गुणगाण गात सत्तेवर आलेली मंडळी आता अण्णांची प्रतारणा करत आहे, हे तितकेच खरे आहे. तरीही जनहितासाठी असे अपमान आण्णांनी अनेकदा पचविले आहेत. चर्चेतून मार्ग निघतात हा हजारे यांचा अनुभव आहे. सरकार विरुद्ध जनहितार्थ आंदोलन करायचे, चर्चा करून लेखी आश्वासन घ्यायचे व नंतर त्या आधारे सरकारला खिंडीत पकडायचे, अशी अण्णांची कार्यपध्दती अनुभवातून झालेली आहे, असे माझे व्यतीगत मत आहे. पंतप्रधान गंगामाईला साफ करण्याचे आश्वासन देवून सत्तेत आले. मात्र, याच मागणीसाठी आंदोलन करणारे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते जे. डी. अग्रवाल यांचे १०८ दिवस उपोषण झाले. त्यातच त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. परंतु उपोषण काळात पंतप्रधानांनी अजिबात लक्ष दिले नाही. निधन झाल्यावर ट्विटरवर निर्लज्जपणे श्रध्दांजली वाहुन मोकळे झाले. असा सत्तेचा माज व मस्ती असलेल्या ठकांशी तुम्ही चर्चा करत आहात. फूट पाडणे, भ्रमीत करणे, भावनिक करणे, परिस्थिती निर्माण करून त्याचा पद्धतशीरपणे फायदा उचलणे यातच हे ठकसेन सराईत आहेत. आजपर्यंतचे कायदे व जनहितार्थ निर्णय या पध्दतीनेच झाले आहेत. सामान्य लोकांचे सरकार बहुमताने सत्तेत जाऊन जनहिताचे प्रश्न सुटु शकतील अथवा निर्णय होतील अशी शक्यता सध्या तरी नाही. विरोधी पक्ष सत्ताधारींवर दबाब ठेऊ शकतात असेही नाही. त्यामुळे अशी आंदोलने आवश्यक आहेत. मात्र, अण्णांना आता अधिकच सावध सजग राहावे लागणार आहे. कारण हे सत्ताधारी फार बेरकी व धूर्त आहेत.

‘अण्णा त्यांना भेटले आणि परत एकदा भाजप सोबत हजारेंची साठगाठ आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरावे अशी पार्श्वभूमी तयार झाली. अण्णांना असे राजकीय लोकांनी त्यांना भेटणे, पाया पडणे आवडते त्याला कोण काय करणार? कधी अशा राजकारण्यांना एखादी भेट नाकारणे किती ताकदवान ठरू शकते, याची अण्णांना जाणीव देणाऱ्यांचे तरी अण्णा कुठे ऐकतात?’ विधीज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.