भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणातील कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाला नवलखांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. यानंतर पुणे पोलिसांनी गौतम नवलाख, अरुण फरेरा, वेर्नोन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल केली होती. नवलाखा आणि इतर आरोपींचे माओवाद्यांशी संबंध आहे. हे सर्व आरोपी सरकारला अस्थिर करण्यासाठी माओवाद्यांसमवेत काम करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. नवलखा म्हणाले होते की, कोणत्याही बंदी घातलेल्या संघटनेशी माझा संबंध नाही. नागरिकांच्या हक्कांसाठी मी फक्त आवाज उठवतो. हे संपूर्ण प्रकरण सह-आरोपींच्या कागदपत्रांवर आणि विधानांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे.

गौतम नवलखा यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात त्यांच्या विरोधात दाखल केलेली एफआयआर फेटाळून लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नवलख यांची ही याचिका उच्च न्यायालयाने 13 सप्टेंबर रोजी फेटाळली होती. खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशीची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. यानंतर, उच्च न्यायालयाने नवलखाच्या अटकेला तीन आठवड्यांसाठी स्थगिती दिली जेणेकरुन ते सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतील आणि त्यांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतील.