मराठा समाजाच्या वैद्यकीय आरक्षणाबाबत 15 जुलैला अंतरिम आदेश : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाच्या मुख्य याचिकेसोबत संलग्नित करण्यात आलेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्यावर आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी वैद्यकिय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अंतिम सुनावणी बुधवारी म्हणजे 15 जुलै रोजी होणार असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे 15 जुलैला कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

मागील सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ घेत झालेल्या प्रवेशावर स्थगिती देण्यास नकार दिला होता, अशी माहिती सुप्रीम कोर्टाचे वकील सचिन पाटील यांनी दिली. तसेच कोर्टाने मुख्य याचिकेसोबत ही याचिका संलग्नित करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान काय नवी आदेश देतं याची उत्सुकता होती.

दरम्यान, मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाल स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2019 मध्ये नकार दिला होता. न्यायालयाच्या या आदेशामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असला तरी आरक्षण देण्याचा कायदा 30 नोव्हेंबर 2018 मध्ये लागू झाला असल्याने याची अमंलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने करण्यात येणार नसल्याचे सांगितले होते.

गायकवाड समितीचा अहवाल स्वीकरत भाजप-शिवसेना युती सरकारने शैक्षणिक तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने 27 जून 2019 रोजी दिला होता. परंतु 16 टक्के आरक्षणाऐवजी शिक्षण क्षेत्रात 12 टक्के तर सरकारी नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षण द्यावे असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता.