पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयानं वकिलास ठोठावला 100 रूपयांचा दंड, फोनवर दिला निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रीपक कंसल नावाच्या वकिलावर १०० रुपये दंड ठोठावला. या वकिलाने सर्वोच्च न्यायालयावर भेदभावाचा आरोप केला होता. कंसल यांनी याचिका दाखल केली होती की, सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्री छोट्या वकिलांसोबत भेदभाव करते. मोठ्या वकिलांची प्रकरणे सुनावणीसाठी त्वरित सूचीबद्ध केली जातात, पण छोट्या वकीलांच्या प्रकरणांच्या सुनावणीस उशीर होतो, असा आरोप त्यांनी केला होता.

फोनवर केली सुनावणी
कंसल यांनी सर्वोच्च न्यायालयात रजिस्ट्री अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. हा आरोप निराधार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय वकिलाला फोनवर दिला. वास्तविक सुनावणी करताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये तांत्रिक दोष आला होता. त्यामुळे या निर्णयाची सुनावणी फोनवर करावी लागली. सध्या कोरोना विषाणूमुळे सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाते.

१९ जून रोजी निर्णय ठेवला होता राखून
१९ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता. कंसल यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करत आरोप केला होता की, काही प्रभावशाली वकील आणि याचिकाकर्त्यांना रजिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत त्यांचे प्रकरण प्राधान्याने सूचीबद्ध केले जाते.