‘त्या’ प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस जारी केली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

राफेल प्रकरणातील लिक झालेल्या महत्वाच्या कागदपत्रांना ग्राह्य धरले जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. हा केंद्रातील सरकारसाठी एक मोठा झटका मानला गेला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राफेल प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उल्लेख करताना राहुल गांधी चुकले. ‘मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो. संपूर्ण देश म्हणतो आहे की चौकीदार चोर है. आज आनंदाचा दिवस आहे की सर्वोच्च न्यायालयाने देखील न्यायाची गोष्ट केली आहे’. असे राहुल गांधी म्हणाले होते.

त्यांच्या या विधानाविरोधात भाजपच्या नेता मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राहुल गांधींवर न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. यावर न्यायालयाने राहुल गांधींना नोटीस पाठवून उत्तर मागितले. त्यावेळी राहुल गांधी यांनी या विधानावर खेद व्यक्त केला. ‘निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जोशात असल्याने माझ्या तोंडून हे वाक्य निघाले’, असे गांधी म्हणाले. मात्र त्यांचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाला समाधान कारक न वाटल्याने आता पुन्हा एक नोटीस पाठवली असून याचे उत्तर ३० एप्रिल पर्यंत मागवण्यात आले आहे.

Loading...
You might also like