ऑक्सिजन, औषधांच्या तुटवड्यावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने घातले लक्ष; केंद्राला नोटीस

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि त्यासंबंधी औषधांचा तुटवडा दिसत आहे. त्यावरून थेट आता सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घातले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजन, औषधांच्या तुटवड्यावर केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

देशातील विविध राज्यांत वैद्यकीय सेवा-सुविधांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे त्यासंबंधी अनेक राज्यांमधील उच्च न्यायालयात सुनावणी घेतली जात आहे. त्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने कोरोनाच्या तयारीसंबंधी कोलकाता, दिल्ली, अलाहाबाद, मुंबई, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या सहा राज्यांतील उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्याची दखल घेतली. ‘ते चांगल्या हितासाठी कार्यक्षेत्र वापरत आहेत. मात्र, यामुळे संभ्रम निर्माण होत आहे’, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काय तयारी केली आहे याची माहिती देण्यास सांगितले आहे. यामध्ये लसीकरणाचाही समावेश आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने चार मुद्द्यांवर केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा, महत्वाच्या औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि लॉकडाउन जाहीर करण्याचा अधिकार यासंबंधी केंद्र सरकारला विचारणा केली आहे.