चौकीदार चोर है प्रकरणी राहूल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा ‘दणका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात फेरसुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली. यावर चौकीदार चोर है हे न्यायायलाने मान्य केलं आहे. असं वक्तव्य करणं राहूल गांधी यांना महागात पडलं आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने या वक्तव्याबद्दल २२ एप्रिल पर्यंत स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी मिनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राफेल खरेदी प्रकरणाची फेरसुनावणी घ्यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी दाखल केलेल्या पुराव्यांचा विचार करण्यात येईल असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा आक्षेप फेटाळून लावला. त्यावर राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागत चौकीदार चोर है हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलं आहे. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भाजप खासदार मिनाक्षी लेखी य़ांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राहूल गांधी हे स्वत:ची मते सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालत आहेत. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे. अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

याप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदींविरोधात कोणतंही मत प्रदर्शन केलेलं नाही. राहूल गांधी यांनी त्याचा विपर्यास केला आहे. अस नमूद करत त्यांना या वक्तव्याबद्दल खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.