काय सांगता ! होय, शर्ट न घालताच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित राहिला वकिल, जज म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –     एका वकीलाने चक्क शर्ट न घालताच व्हिडीओ कॉलवरून होणा-या सुनावणीसाठी (advocate-shirtless-during-vc) उपस्थित राहिले होते. सुदर्शन टीव्ही प्रकरणाच्या खटल्यासंदर्भातील सुनावणी दरम्यान हे पाहून सर्वौच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ( supreme-court-judges-shocked-to-see) सोमवारी धक्काच बसला. या संदर्भात न्या. डी. व्हाय. चंद्रचूड आणि त्यांच्या खंडपीठाने आक्षेप घेत ही व्यक्ती कोण होती यासंदर्भात विचारणा केली आहे..

खटल्यासंदर्भातील सुनावणी सुरु झाल्यानंतर काही क्षणात मोठ्या स्क्रीनवर न्यायाधिशांना शर्ट न घातलेल्या अवस्थेतील व्यक्ती दिसली. एखाद्या वर्गामध्ये शिक्षकांनी विचारावे त्याप्रमाणे न्यायमुर्तींनी तीन चार वेळा यासंदर्भात विचारणा करुनही कोणीच उत्तर दिले नाही. झालेला गोंधळ पाहून वकिलाने लॉग आऊट केल्याने यावर कोणी उत्तर दिले नसल्याचे समजते. खटल्याची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर न्या. चंद्रचूड यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे लाइव्ह लॉ इन या वेबसाईटने आपल्या वृतात म्हटले आहे.

कोणीतरी या सुनावणीसाठी शर्ट न घालताच उपस्थित राहिले होते. यासंदर्भात काही ठोस नियम हवेत, असे न्या. चंद्रचूड यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितल आहे. घडलेला प्रकार खूपच वाईट होता असे खंडपीठातील सदस्य असणाऱ्या न्या. इंदू मल्होत्रा यांनी म्हटले आहे.

ही घटना अक्षम्य असल्याचे मत सॉलिसिटर जनरल असणाऱ्या मेहता यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना व्यक्त केल आहे. या प्रकरणासंदर्भात संबंधित वकीलाशी बोलून अशी चूक त्यांच्याकडून पुन्हा होणार नाही याबद्दल काळजी घेण्याच्या सूचना कराव्यात असे न्या. चंद्रचूड यांनी मेहता यांना सांगितलं. ओपइंडियाची बाजू मांडणाऱ्या वकीलांकडून ही चूक झाल्याचे लाइव्ह लॉ इनने म्हटले आहे. सध्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉलवरुन होत असली तरी असे प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमानच आहे. या व्हिडीओवरुन होणाऱ्या सुनावण्या या इतर सुनावण्यांप्रमाणेच असून वकिलांनी यासंदर्भात जास्त दक्ष राहणे गरजेचं आहे. अशा घटनांसंदर्भात कारवाई करण्याची आपली इच्छा नाही. मात्र सुनावणीला येताना वकिलांनी आपण न्यायाधिशांसमोर जाणार आहोत याच भान ठेवले पाहिजे असेही न्या. चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

दरम्यान काही आठवड्यांपूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉलवरील सुनावणीदरम्यान धुम्रपान केल्याप्रकरणी एका वकिलाला दंड ठोठावला होता. तर त्यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी बनियानमध्ये उपस्थित राहणाऱ्या वकिलालाही फटकारले होते.