Coronavirus Impact : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! वकील दिसणार पांढर्‍या शुभ्र कपड्यात

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने अनेकांना संकटात टाकले आहे.
सुप्रीम कोर्टही यातून सुटलेले नाही. कारण, या आजाराच्या पार्श्वभूमीवर वकिलांना व्हिडिओ सुनावणीदरम्यान अंगात काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचे बंधन नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टासमोर युक्तीवाद करणारे वकील केवळ पाढरा शर्ट आणि नेक टाय वापरु शकतील, त्यावर काळा कोट घालण्याची गरज नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून सुप्रीम कोर्टाने तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णयजाहीर केला आहे.

सुप्रीम कोर्टाने एक निवेदन जाहीर केले असून, व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान, वकील मंडळी प्लेन पांढरा शर्ट, पांढरी सलवार-कमीज, पांढरी साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरु शकतात. जोपर्यंत कोरोना संदर्भातील परिस्थिती कायम आहे किंवा पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. ह्रषिकेश रॉय हे वरिष्ठ न्यायाधीश व्हर्च्युअल कोर्टात काळ्या कोटशिवाय समोर आले होते. यावेळी त्यांनी केवळ पांढरा शर्ट आणि नेकबँड वापरला होता. सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, त्यांनी काळा कोट आणि रोब काढून ठेवला आहे. कारण, तज्ज्ञांनी असा सल्ला दिला आहे की, अशा प्रकारचे कपडे हे कंटेन्मेट प्रोटोकॉलमध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे वकिलांना देखील आत्तापासून हा नियम लागू होतो. यासंदर्भातील नियमावली लवकरच जाहीर केली जाईल, असेही सरन्यायाधीश म्हणाले.