विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची UP सरकारला विचारणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या विशेष पोलीस पथकाने विकास दुबेला चकमकीत ठार केले होते. दुबे आणि त्याच्या टोळीने उत्तर प्रदेशच्या आठ पोलिसांची हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार होता. मध्य प्रदेशातून अटक करुन उत्तर प्रदेशला आणत असताना दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता चकमकीत त्याला ठार करण्यात आले.

एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखेखाली सीबीआय किंवा एनआयएच्या मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला कोणत्या प्रकारची समिती हवी आहे अशी विचारणा केली असून उत्तर देण्यासाठी गुरुवारपर्यंत वेळ दिला आहे. 20 जुलै रोजी याप्रकरणी पुढील सुनावी होणार आहे.

तेलंगणामध्ये केले तसेच काहीसे आम्ही येथे करु. कोणत्या प्रकारची समिती तुम्हाला हवी आहे ते सांगा, असे सरन्यायाधीशांनी तेलंगणच्या एन्काऊंटरचा उल्लेख करताना म्हटले आहे. तेलंगणा पोलिसांनी 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या करणार्‍या चार आरोपींना चकमकीत ठार केले होते. ताब्यात असणार्‍या आरोपींनी आपल्यावर काठी आणि दगडाने हल्ला करण्यास सुरुवात केल्याने त्यांना ठार केल्याचे तेलंगणा पोलिसांनी सांगितले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने लगेचच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. अद्याप समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही.