Cryptocurrency वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, आता भारतात करता येणार Bitcoin चा वापर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सी बाबत मोठा निर्णय सुनावताना यावरील लावण्यात आलेले निर्बंध हटवले आहेत. आता देशातील सर्व बँका याचे व्यवहार सुरू करू शकतात. आरबीआयने 2018 मध्ये एक सर्क्युलर जारी करून बँकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करण्यास मनाई केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भारतीयसुद्धा बिटकॉईनसारखी क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्रि करू शकतात.

काय आहे प्रकरण
आरबीआयच्या सर्क्युलरला आव्हान देण्यासाठी इन्टरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान आयएएमएआयने म्हटले की, केंद्रीय बँकेच्या या निर्णयामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये होणार्‍या वैध व्यवहारांवर बंधन आले आहे. यावर उत्तर देण्यासाठी आरबीआयने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. आरबीआयने म्हटले की, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी आर्थिक हालचालींचा धोका विचारात घेऊन हे पाऊल उचलले होते.

काय आहे क्रिप्टोकरन्सी?
क्रिप्टोकरन्सी एक डिजिटल करन्सी असते, जी ब्लॉकचेन तंत्रावर अधारित आहे. या करन्सीमध्ये कोडिंग तंत्राचा वापर केलेला असतो. या तंत्राद्वारे करन्सीच्या ट्रांजक्शनची पूर्ण माहिती ठेवली जाते. ज्यामुळे ही हॅक करणे खुप अवघड आहे. याच कारणामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणुकीचे प्रकार खुप कमी होतात. क्रिप्टोकरन्सचे ऑपरेटींग केंद्रीय बँकेतून स्वतंत्र होते, जी याची सर्वात मोठी त्रुटी आहे.