महिला न्यायाधीशाबरोबर ‘फ्लर्ट’ करणाऱ्या माजी न्यायाधीशाला SC ने फटकारले, म्हणाले – ‘न्यायव्यवस्थेत अशा प्रकराचे वर्तन अजिबात मान्य नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कनिष्ठ महिला न्यायाधीशाबरोबर फ्लर्ट करणाऱ्या मध्य प्रदेशच्या माजी जिल्हा न्यायाधीशाला मंगळवारी (दि. 16) सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. न्यायव्यवस्थेत एखाद्या कनिष्ठ महिला न्यायाधीशाबरोबर वरिष्ठ न्यायाधीशाचे अशा प्रकारचे वर्तन अजिबात मान्य नाही, तसेच पदाला शोभणारे नसल्याचे मुख्य न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत, शिस्तविषयक केलेल्या कारवाई विरोधात निवृत्त न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली होती.

महिला न्यायधीशाने विषय संपवण्याचा निर्णय घेतला असताना, आता या प्रकरणात कुठली चौकशी होऊ नये, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे, तर माजी न्यायाधीशांचे वर्तन हे पदाला शोभणार नाही. त्यामुळे स्वत:हून या प्रकरणाची दखल घ्यावी लागली, असे उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा बचाव करताना सांगितले. सुनावणीच्या वेळी युक्तीवाद करताना वरिष्ठ वकिल रविंद्र श्रीवास्तव यांनी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि महिला न्यायाधीशामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरुन झालेला संवाद वाचून दाखवला.

महिला न्यायाधीशाला स्पर्श करण्याची तसेच पती-पत्नी सारखे संबंध ठेवण्याची इच्छा माजी जिल्हा न्यायाधीशाने मेसेजद्वारे बोलून दाखवली होती. महिला न्यायाधीशाने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ न्यायाधीशाविरोधात जबाबदही नोंदवला होता. पण नंतर त्यांनी माघार घेतली होती. आपण वाद मिटवल्याचे महिलेने सांगितले, श्रीवास्तव यांनी सुनावणी दरम्यान या मुद्याकडे लक्ष वेधले. या प्रकरणात पुरुष न्यायाधीश वरिष्ठ न्यायिक अधिकारी होता. त्यामुळे महिला न्यायाधीशावर नक्कीच काही तरी दबाव असल्याने त्यांनी माघार घेतल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे.