विरोधकांना मोठा धक्का ! ‘ईव्हीएम’बाबतची ‘ती’ मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – मतमोजणीच्या वेळी ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याबरोबरच निवडणुक आयोगाला याबाबत मार्गदर्शन सुचना कराव्यात, अशी मागणी करणारी २१ विरोधकांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

देशातील २१ विरोधी पक्षांनी एकत्र येत ईव्हएम मशीनवर अविश्वास दाखविला होता. निवडणुक आयोग प्रत्येक विधानसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रावरील व्ही व्ही पॅटची मोजणी करणार आहे. त्याविरोधात विरोधकांनी याचिका करुन किमान ५० टक्के व्हीव्ही पॅटची मोजणी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्याला फक्त भाजपने विरोध केला होता. निवडणुक आयोगाने या मागणीला विरोध करताना त्यामुळे निकाल लागण्यास सहा दिवस लागतील, असे सांगितले होते.

त्यावर निवडणुक आयोगाने विरोधकांची मागणीतील सिद्धांत मान्य करुन प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक ऐवजी ५ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांची मागणी फेटाळून लावली.

याबाबत काँग्रेसचे मनीष सिंघवी यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत विरोधक खुश नाहीत. आम्ही ५० टक्के व्हीव्ही पॅटच्या मोजणीची मागणी केली होती. त्यातील सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने मान्य करुन एक ऐवजी ५ मतदान केंद्रातील व्हीव्ही पॅटची मोजणी करण्याचे आदेश दिले. मात्र, जर या ५ मतदान केंद्रापैकी ३ अथवा ४ मतदान केंद्रातील व्हीव्ही पॅटमध्ये फरक आढळून आला तर, पुढे काय याबाबत निवडणुक आयोगाची कोणतीही मार्गदर्शक सुचना नाहीत. हे सॅम्पल म्हणून मोजणी होणार आहे. त्यामुळे जर सॅम्पलच दुषित आढळून आले तर सर्व दुषित आहे असे समजले पाहिज. अशी आमची मागणी होती. पण न्यायालयाने त्यावर काहीही मत व्यक्त केले नाही.