Tandav Web Series : Amazon च्या अपर्णा पुरोहितांबाबत सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ इंडियावर रिलीज झालेली तांडव हि सिरीज प्रचंड वादात सापडली होती. या वादग्रत वेबसीरिजच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित यांना अखेर सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अपर्णा पुरोहित यांना अटक करू नये, असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांवरही टिप्पणी केली आहे.

‘सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकारने जे नियम तयार केले आहेत, ते पुरेसे नाहीत. त्याद्वारे खटला चालवण्याइतके ते सबळ नाहीत,’ असे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या खटल्याची सुनावणी करताना कोर्टाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह कंटेंट दाखवला जात असल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफीही दाखवली जात असल्याने त्या कंटेंटवर नियंत्रण असणे गरजेचे आहे असेसुद्धा कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अपर्णा पुरोहित यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करत, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीचे नियम आताच आले आहेत. आता कंपनी लवकरच ते पाहील. तसंच अपर्णा या अ‍ॅमेझॉनच्या एक कर्मचारी आहेत. या प्रकरणी कारवाई करायचीच झाली, तर ज्यांनी वेबसीरिज तयार केली, त्यांच्याविरोधात व्हायला हवी, असे मुकुल रोहतगी म्हणाले.

अटकपूर्व जामीन देण्यास अलाहाबाद कोर्टाकडून देण्यात आला होता नकार
या प्रकरणामध्ये २५ फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले. तांडव या वेबसीरिजमधून हिंदू देवी-देवतांचं अवमानकारक चित्रण आणि धार्मिक द्वेषाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवरून उत्तर प्रदेश पोलिसांकडून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. तसेच या वेब सिरीजमधून हिंदू देवी-देवतांची बदनामी करणं आणि पंतप्रधानांचं पात्र नकारात्मक पद्धतीने दर्शवल्याचा आरोप करण्यात आला होता.