एसटी चालक संतोष माने याची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूला तसेच ३७ जण जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी संतोष मारुती माने या एसटी चालकाला मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत रूपांतर केले आहे.

काय आहे प्रकरण –

पुण्यात २५ जानेवारी २०१२ रोजी एसटी बसचालक संतोष माने (रा. कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) याने अचानकपणे एसटी बस चालवून रस्त्यावरील नऊ निष्पाप व्यक्तींचा जीव घेतला होता. तर अन्य ३८ जणांना जखमी केले होते. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने माने यास दोषी धरून फाशीची शिक्षा ठोठावली होती. या फाशीच्या शिक्षेविरुद्ध माने याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलाची सुनावणी न्या. हरदास व न्या. देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली होती.

आरोपीला दोषी धरल्यानंतर त्यास शिक्षेविषयी त्याची बाजू मांडण्यासाठी संधी देणे बंधनकारक आहे. परंतु पुणे सत्र न्यायालयाने तशी संधी दिली नाही, असे आरोपीतर्फे अ‍ॅड. जयदीप माने यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते. हे म्हणणे मान्य करून खंडपीठाने आरोपी माने याची फाशीची शिक्षा रद्द करून फेरचौकशीसाठी खटला पुन्हा पुणे सत्र न्यायालयाकडे वर्ग केला होता. पुणे सत्र न्यायालयाने आरोपी माने यास पुन्हा दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावली असता त्या निकालाविरुद्ध त्याने केलेले अपील उच्च न्यायालयातील न्या. व्ही. के. कानडे व न्या. डी. बी. कोदे यांच्या खंडपीठाने फेटाळून फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे अपील दाखल केले होते.