‘सांगली बंद’ मागे राजकीय ‘षडयंत्र’, खा. सुप्रिया सुळेंचा भाजपवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खाजदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता चांगलेच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भाडे यांनी सांगली बंदची हाक देऊन राऊत यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र या बंद बाबत बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला आहे.

उदयन राजे यांनी छत्रपती वंशाचे असल्याचे पुरावे द्यावेत, अशा प्रकारचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर अनेकांनी टीका देखील केली. विशेष म्हणजे आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचे आहे, अशा प्रकारचे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रकांत पाटील यांना आमच्या सरकारवर टीका करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तो त्यांना संविधानाने दिला आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच सुप्रिया सुळे या वेळी म्हणाल्या, आमच्या सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत. शेतकरी, नोकरी, अर्थव्यवस्था याकडे प्रामुख्याने पाहणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आधीचे सरकार दडपशाहीचे होते. मात्र आमचे तसे नसल्याचे सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांना तुम्ही संजय राऊत यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काही सल्ला देणार का ? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना माझ्याकडे कोणी सल्ला मागितल्याशिवाय मी कोणालाही सल्ला देत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले होते, मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण चांगलेच तापू लागले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/