मोदींच्या मतदार संघापेक्षा माझा मतदार संघ वरचढ : सुप्रिया सुळे

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा बारामती मतदार संघ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी पेक्षाही वरचढ ठरल्याच म्हटलं आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवण्यात आल्यामुळे हा मतदारसंघ देशात नंबर वन ठरलाय. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघापेक्षाही अधिक बारामती लोकसभा मतदारसंघात राबविण्यात आल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जेजुरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसीस सेंटरचं उद्घाटन, पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रीय वयोश्री योजनेत बारामती लोकसभा मतदार संघ वाराणसी मतदार संघाच्याही पुढे गेला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या मतदारसंघात तब्बल ११ हजार ७३७ लाभार्थ्यांना साहित्य वाटप झालं आहे. वयोश्री योजना प्रभावीपणे राबवणारा बारामती हा देशातला नंबर वन मतदार संघ ठरला आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, बारामतीत शुक्रवारी १५ फेब्रुवारी रोजी योजनेचे साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडेल. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.