‘त्या’ कामाच्या जोरावर बारामतीत विजय निश्‍चित : सुप्रिया सुळे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. बारामती मतदारसंघात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे लोकसभा निवडणुकीत आपला विजय निश्‍चित असून मतदार संघात विकासकामांच्या जोरावरच मतदारांकडे मते मागणार आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुक्याच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.

मतदारसंघात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विजय निश्‍चित आहे. असा विश्वास व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मतदारसंघाचे हित बघणाऱ्यांना मतदार विसरत नाहीत. वयोश्री योजनेत बारामतीचा आदर्श पॅटर्न तयार झाला आहे. त्यात इंदापूर तालुक्‍याचे योगदान मोठे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे व सहकाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे इंदापूर तालुक्‍यात सर्वाधिक काम झाले.’

यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्या म्हणाल्या की, ‘भाजपचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. यांच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. एकही नवीन शाळा व महाविद्यालय सुरू झाले नाही. धनगर समाजास आरक्षण मिळाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची अद्याप उभारणी झालेली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे. पाण्याचेही योग्य नियोजन नाही. ‘

या पत्रकार परिषदेला आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, संचालक अनिल बागल, कार्याध्यक्ष अमोल भिसे, किसन जावळे, भाऊसाहेब सपकळ, सचिन सपकळ आदी उपस्थित होते.

बारामती मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकर उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील निवडणुकीत सुळे यांचा ६९ हजार ७१९ मतांनी अगदी निसटता विजय झाला. सुळे यांना एकूण ५ लाख २१ हजार ५६२ मते मिळाली होती तर जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती.