एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं हे कपडे बदलल्या प्रमाणे झालं आहे – सुप्रिया सुळे

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध पक्ष मतदारसंघांमधील आपल्या उमेदवारांची नवे निश्चित करत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीतून बडे नेते भाजप-शिवसेनेकडे जाण्याचे सत्र काही केल्या थांबत नाहीये. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पक्ष सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका केली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं हे कपडे बदलल्या प्रमाणे झालं आहे अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.परभणी येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मुले वडिलांना दुसऱ्याच्या दारात मुजरा करायला लावतायेत :
पक्षांतर करणाऱ्यांवर टीका करताना त्या म्हणाल्या कारखाना, बँक, ED आणि CBI या कारणामुळे लोक सोडून जात असल्याचं आम्हाला सांगत आहेत. सत्ताधारी हीन दर्जाचं राजकारण करत आहेत. पक्षांतर करणारे जे नेते चाललेत ते वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात. सत्तेसाठी अनेक नेते स्वाभिमान सोडून लाचार होत आहेत असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांवरही टीका :
यावेळी सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. कोल्हापूर, सांगली साताऱ्यातील पुरपरिस्थितीचा धागा पकडून त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकही दिवस पूर परिस्थिती असलेल्या सांगली आणि कोल्हापूरात राहिले नाहीत. विमानातून आले आणि गाडीतून फिरून गेले. लोकांना भेटून विचारपूस किंवा प्रत्यक्ष पाहणीही त्यांनी केली नाही.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतली गळती थांबत नाहीये. सुनील तटकरेंचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रायगडात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

तसेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपक आबा साळुंखे यांनी राजीनामा दिला असून सांगोल्याचे माजी आमदार दिलीप आबा साळुंखे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.’मला सांगोला इथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. तशी मी पक्षाला मागणी सुध्दा केली. मला उमेदवारी देऊन पक्ष मला न्याय देईल ही अपेक्षा ठेवत आहे. पण मतदारसंघातील काम आणि जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचं काम या दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करणं शक्य नसल्यानं मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे’ असे कारण दिलीप आबा साळुंखे यांनी दिले. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. हे दोघेही शरद पवारांचे निष्ठावान आणि खंदे कार्यकर्ते मानले जातात.