खा. सुप्रिया सुळेंचा घणाघात, म्हणाल्या – ‘हातात भाकरी घेऊन रेल्वेखाली चिरडलेल्या मजुरांचे मृतदेह सरकारला दिसले नाहीत का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. या स्थलांतरादरम्यान अनेक मजुरांचा मृत्यू झाला होता. मात्र, या मजुरांची नोंद आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांना मदत देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने केला होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

केंद्र सरकारने दिलेल्या या स्पष्टीकरणावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्थलांतरीत मजूरांची नोंद आपल्याकडे नाही त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कळवले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून ही असंवेदनशीलता कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी आहे.

सुरुवातीला कोरोनाचे कोणतेही गांभीर्य न ओळखलेल्या सरकारने नंतर मात्र कसलेही नियोजन न करता अतिशय घाईघाईने लॉकडाऊन जाहीर केलं. त्यामुळे अनेक गरीब मजूरांना उपाशीपोटी, हजारो किलोमीटर रस्त्याने पायी चालत जायला भाग पडले. त्यापैकी अनेकांनी वाटेतच प्राण सोडले. गोरगरिबांचे हे हाल केंद्र सरकारच्या लक्षात आले नाहीत का ?रेल्वे रुळावर हातात भारी घेऊन झोपेतच कटलेल्या मजूरांचे मृतदेह केंद्र सरकारला दिसले नाहीत का ? बापाच्या खांद्यावर भुकेने व्याकूळ होऊन मरण पावलेल्या लोकरांचा टाहो ऐकायला आला नाही का ? ही असंवेदनशीलता भयावह आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like