‘एवढी’ मालमत्ता असूनदेखील आत्या सुप्रिया सुळेंनी घेतलं भाचा पार्थकडून कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथील विद्यमान खासदार आणि आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी काल बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला आपल्या संपत्ती विषयक माहिती द्यावी लागते. सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार यांच्याकडे तब्बल १४५ कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर ५५ लाखांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडून देखील सुप्रिया सुळे यांनी कर्ज घेतले आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्याकडे सुद्धा सुप्रियांची उसनवारी असल्याचे पुढे आले आहे.

महत्वाचे म्हणजे १४५ कोटींची संपत्ती असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याकडे एकही गाडी नाही. सुळे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात स्थावर १८ कोटी ४० लाख तर जंगम २१ कोटी २६ लाख रुपये मालमत्ता असल्याची माहीती त्यांनी दिली आहे. दरम्यान यावेळी पुणे मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

सुप्रिया सुळे यांचा अर्ज भरताना मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार पार्थ पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल अशी लढत पाहायला मिळणार आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मनाला जातो. पण यंदा मात्र पवार कुटुंबाच्या नातलगांपैकी एक असणाऱ्या कुल यांच्या विरोधात लढत होणार आहे.