टिका करणाऱ्यांचे सुप्रिया सुळे यांनी मानले जाहिर आभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरुद्ध बोलल्यानंतर हेडलाईन होते त्यामुळेच भाजपचे नेते विकास आणि धोरणावर बोलण्याऐवजी आमच्यावर टीका करीत आहेत. मी त्यांचे आभार मानते असे बारामती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी येथे नमूद केले.

पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला धमकाविल्या प्रकरणी सुळे यांनी निषेध नोंदवला.” एका वृत्तवाहिनीची बातमी सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी धमकाविले. पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतलीच नाही. त्यामुळे या कार्यकर्त्याने माझ्याशी संपर्क साधला. मी पोलिसांशी चर्चा केल्यानंतर गुन्हा दाखल झाला.” असे सांगत सुळे यांनी हा धमकावण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचं नमूद करीत निषेध नोंदवला.

आपण मोकळा श्वास देखील घेऊ शकू की नाही ? अशी चिंता व्यक्त करीत त्यांनी भाजपवर टीका केली. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा झाल्या. या सभांमध्ये मोदी यांनी शरद पवार यांनाच लक्ष्य केले याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता सुळे यांनी मोदी यांचे जाहीर आभार मानले. ” धोरणावर ते बोलू शकत नाहीत म्हणून पवार कुटुंबीयांविरुद्ध ते बोलत आहेत.

पवार कुटुंबीयांविरुद्ध बोलल्यानंतर हेडलाईन होते हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच पवार कुटुंबीयां विषयी भाजप नेते सध्या बोलत आहेत. कश्मीर मधील परिस्थिती संवेदनशील आहे. त्यामुळे 370 हे कलम रद्द करणे ची भूमिका हे योग्य ठरू शकणार नाही. गेल्या पाच वर्षात सत्तेवर असणाऱ्या भाजपने या विषयावर संसदेत चर्चा केली नाही. तेथील युवा पिढी समोर रोजगाराचा प्रश्न आहे. त्याविषयी देखील कोणतीच चर्चा भाजपने केली नाही. तेथील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला पाहिजे” असे सुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.” महाराष्ट्रात दुष्काळ हा फार मोठा प्रश्न असून त्याविषयी निवडणुकीत कोणीही बोलत नाही.

सुशिक्षित बेरोजगारी हा शहरी भागातील मोठा प्रश्न आहे .त्याविषयी कोणी बोलत नाही “अशी खंतही त्यांनी व्यक्त केली . बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते प्रचाराला येणार आहेत मुक्काम ठोकून आहेत याविषयी सुळे यांनी ‘अतिथी देवो भव!’ एवढी च प्रतिक्रिया दिली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील सर्वोत्तम मतदारसंघ असल्याचे सरकारी आकडेवारी तून स्पष्ट होत आहे , असा दावाही सुळे यांनी केला . त्याचवेळी स्मृती इराणी यांच्या शपथपत्रा तील शिक्षणाच्या उल्लेखासंदर्भात सुळे यांनी स्मृती इराणी यांच्या कडून आपल्याला ही अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया नोंदवली.

Loading...
You might also like