मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On Amit Shah | शिर्डी येथे भाजप प्रदेश कार्यकारणी अधिवेशन (दि.१२) BJP State Convention in Shirdi आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात संवाद साधताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवारांसह (Sharad Pawar) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधत जहरी टीका केली होती. ” १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं. दगफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली”, असे टीकास्त्र अमित शहा यांनी सोडले होते.
दरम्यान अमित शहा यांच्या या टीकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय. त्यांनी जरूर टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.